जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील हुंडाई शोरूमजवळ तरूणाला चाकूचा धाक दाखवत मोबाईलसह रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अनुभव सौरभ नायक (वय-२६) रा. शिव कॉलनी, जळगाव हा तरूण मार्केटींग डायरेक्टर म्हणून काम करतो. बुधवारी ६ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेया दरम्यान अनुभव नायक हा राष्ट्रीय महामार्गावरील हुंडाई शोरूमजवळून जात असतांना अज्ञात दोन जण दुचाकीवर आले. यातील दुचाकीच्या मागे असलेल्या एकाने अनुभवला चाकूचा धाक दाखविला आणि खिश्यातील १० हजाराचा मोबाईल आणि ७०० रूपयांची रोकड असा एकुण १० हजार ७०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरून नेला. याप्रकरणी अनुभव नायक याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.