जळगाव प्रतिनिधी । जळगावचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांचा भाचा वॉटरग्रेस कंपनीचा कर्मचारी असल्याने ते या कंपनीवर मेहरबानी दाखवत असल्याचा आरोप आज माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या चर्चासत्रात केला.
वॉटरग्रेस कंपनीचा भोंगळ कारभार व त्याची पाठराखण करणारे कर्मचारी हा जळगावात संतापाचा विषय बनला आहे. यातच या प्रकरणातील अनेक कंगोरे समोर येऊ लागले आहेत. आज सकाळीच ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी सोशल मीडियातील एका पोस्टच्या माध्यमातून माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वॉटरग्रेसचा ठेका देण्यासाठी सव्वा कोटी घेतल्याची चर्चा असून त्यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या पाठोपाठ लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या आज आयोजित चर्चासत्रात माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, वॉटरग्रेस कंपनीत उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांचा भाचा कामाला असून त्यांनी खासगीत या बाबीला दुजोरा दिला आहे. याचमुळे ते वॉटरग्रेसवर मेहरबानी दाखवत असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला.
दीपककुमार गुप्ता यांनी या टॉक शो मध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे साटेलोटे असल्याचाही आरोप केला. या चर्चासत्रात त्यांच्यासोबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल देखील सहभागी झाले होते. तर याचे सूत्रसंचालन कार्यकारी संपादक विजय वाघमारे यांनी केले.
खालील व्हिडीओत पहा हे संपूर्ण चर्चासत्र.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/315681832740633