दोन बायकांची पाच मुले ; धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार ?

 

 

मुंबई: वृत्तसंस्था । पहिल्या बायकोपासूनची तीन आणि करुणापासूनची दोन अशी पाच मुले असल्याचं धनंजय मुंडे यांनी कबूल केलं आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास निवडणूक लढवण्यास मनाई असताना त्यांची आमदारकीही धोक्यात आहे का? असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी एक फेसबूक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला आहे. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचं मान्य केलं आहे. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं नाही.

मुंडे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोचीच माहिती दिली होती. दुसऱ्या महिलेची माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत. ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, मुंडे यांचं हे प्रेमप्रकरण असल्याचं दिसतं. या संबंधातून त्यांना दोन मुलंही झाली आहेत. त्याबाबतची तक्रार त्यांच्या कायदेशीर पत्नीने करायला हवी किंवा पहिल्या पत्नीने तक्रार केली नसेल तर दुसऱ्या महिलेने तक्रार केली पाहिजे. तरच ती तक्रार ग्राह्य धरली जाते. इतरांनी केलेली तक्रार ग्राह्य धरली जात नाही. तशी तक्रार करण्याचा कायदेशीररित्या कुणालाही अधिकार नाही.

अपत्याच्या कायद्यानुसार दोन अपत्यांमध्ये तिसऱ्या मुलाची भर पडल्यास तो कायद्याने गुन्हा असून अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. मुंडे यांनी दुसऱ्या महिलेपासून झालेल्या दोन मुलांची माहिती लपवली आहे. ही मुले २००१ नंतर जन्मलेली असतील तर मुंडे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

मुंडे यांच्या उमेदवारीला कोणी तरी आव्हान देऊ शकतं. त्यांनी कायदेशीररित्या निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात खरी माहिती देणं बंधनकारक होतं. नाही तर ते प्रतिज्ञापत्रं खोटं ठरलं जातं. खोटी माहिती देणं हा गुन्हा आहे. भारतीय शपथेचा कायदा आणि प्रतिज्ञापत्रासंदर्भातला कायद्यानुसार माहिती नं देणं चुकीचं आहे. पण भारतातील सर्वोच्चपदापासून ते खालच्या स्तरापर्यंतचे पदाधिकारी खोटं प्रतिज्ञापत्रं सर्रासपणे देत असतात. खोटं प्रतिज्ञापत्रं देणं हेच योग्य आहे, असा सगळ्यांचा समज झाला आहे, असं सांगतानाच आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पत्नी नसल्याचं प्रतिज्ञापत्रं दिलं होतं. दुसऱ्या निवडणुकीत त्यांनी पत्नी असल्याचं मान्य केलं होतं, याकडे ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी लक्ष वेधलं.

सर्वोच्च न्यायालयाने मागे एक निर्णय दिला होता. त्यानुसार स्त्री-पुरुष संबंध कायदेशीर-बेकायदेशीर होऊ शकतात. पण कोणत्याही संबंधातून झालेलं मुल बेकायदेशीर असू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यामुळे मुंडे यांनी त्याची माहिती द्यायला हवी होती, असं सरोदे यांनी सांगितलं. त्यांच्या अपत्याच्या मुद्द्यावरून कोणीही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतो. पण त्यांच्या पत्नींबाबत तक्रार करता येणार नाही. निवडणूक आयोगही स्वत:हून कारवाई करू शकतात. पण आपल्याकडे निवडणूक आयोग सक्षमपणे काम करताना दिसत नाही. टी. एन. शेषण यांचा काळ सोडला तर निवडणूक आयोग राजकीय पक्षाने प्रेरित होऊनच काम करताना दिसत आहे, असं सांगतानाच पण मुंडेंची कुणी तक्रार केल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, असंही सरोदे यांनी स्पष्ट केलं.

सरोदे म्हणाले की, मुंडे प्रकरणात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे त्यांनी दुसरं लग्न केलं नाही. त्यामुळे परस्पर सहमतीने संबंध ठेवलेली स्त्री ही त्यांची कायद्याने बायको ठरत नाही. ते प्रेम विवाह केल्याचं म्हणतात. आपल्याकडे विवाहाचे पारंपारिक प्रकार आहेत. त्यात गांधर्व विवाह वगैरे येतात. सप्तपदी घेऊन किंवा रजिस्टर मॅरेज केलं नसेल तर कायदेशीररित्या ती बायको समजली जात नाही. त्यामुळे प्रेम विवाह असला तरी ती कायदेशीरदृष्टीकोनातून बायको होऊ शकत नाही. त्यामुळे निवडणूक प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या संबंधाची माहिती दिली नाही, हे कारण त्यांच्यासाठी होऊ शकत नाही.

Protected Content