चोपडा प्रतिनिधी । दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या अपघातात चिमुकलीसह तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरूध्द चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र गोपल मराठे (वय-२०) आणि ज्ञानेश्वर रमेश मराठे (वय-३५) आणि चार वर्षाची मुलगी चैताली ज्ञानेश्वर मराठे सर्व रा. धरणगाव हे (एमएच १९ बीई २५३७) क्रमांकाच्या दुचाकीने धरणगाव येथे परत येत असतांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणारी (एमएच १८ एडी ६९२) क्रमांकाच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील रविंद्र मराठे, ज्ञानेश्वर मराठे आणि चैताली मराठे हे तिघे जखमी झाले. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी घडली. तिघांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रविंद्र गोपाल मराठे यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देविदास ईशी करीत आहे.