मुंबई : वृत्तसंस्था । आता राज्यातले अजून एक मंत्री संकटात असून त्यांचा देखील राजीनामा आज-उद्या होईल, असा गंभीर दावा भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सचिन वाझे प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना देखील पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे सचिन वाझे प्रकरणावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसल्याचंच दिसून येत आहे.
अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. मात्र, कारचा मालक मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यूनंतर हे प्रकरण अधिकच चिघळलं आणि आता एनआयए आणि एटीएस अशा दोन संस्था मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये मुंबईच्या सीआययूचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कथित सहभागाची देखील एनआयएकडून चौकशी सुरू असून सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली आहे. सचिन वाझेंवर परमबीर सिंग आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच हात असल्याचा दावा करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांकडून केली जाऊ लागली आहे.
सचिन वाझे प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना भूमिका मांडली. “वाझेंच्या विषयात दोन एजन्सी काम करत आहेत. या प्रकरणाची खूप लांबपर्यंत मुळं गेली आहेत. ती खणून काढण्यात एनआयए आणि एटीएस यशस्वी होतील. आज संध्याकाळपर्यंत महत्त्वाच्या घटना घडतील. एका मंत्र्याचा राजीनामा झाला आहे. दुसऱ्याचा कधीही होईल अशी परिस्थिती आहे. आणि तिसऱ्याचा आज-उद्या व्हायला हवा”, असं पाटील म्हणाले. काही दिवसांपूर्वीच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता अनिल देशमुख विरोधकांच्या टार्गेटवर आहेत. त्यात पुन्हा अजून एक मंत्री राजीनामा देण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.