दोन्ही राजेंच्या मनोमीलनासाठी पवारांचा पुढाकार

सातारा प्रतिनिधी । छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात मनोमीलनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचे सुखद चित्र येथे दिसून आले आहे.

सातारा येथील छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वैमनस्य सर्वश्रुत आहे. दोन्ही गट अनेकदा अगदी आमने-सामने भिडले असून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सातत्याने होत असतात. या पार्श्‍वभूमिवर, आता शरद पवार यांनी पुढाकार घेऊन दोन्ही राजेंना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले आहे.

शरद पवार हे सातार्‍यातील एका हॉस्पिटलच्या उदघाटन कार्यक्रमला सातारा दौर्‍यावर आले होते. सातारा येथील पोलीस परेड ग्राऊंडवर हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, शशिकांत शिंदे हे लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते. शरद पवारांचे आगमन झाल्यानंतर ते कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी शरद पवार हे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या गाडीतून निघाले व खा. उदयनराजे, आ. शशिकांत शिंदे यांना याच गाडीत बसविण्याचा आग्रह त्यांनी केला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या गाडीच्या चालकाला उतरविले आणि स्वतः गाडी चालविण्यास बसले. शिवेंद्रसिंहराजे बाजूला शरद पवार, मागे उदयनराजे आणि त्यांच्या बाजूला शशिकांत शिंदे असे चार नेत्यांनी एकत्रित कार्यक्रम स्थळापर्यंत प्रवास केला. यानंतर कार्यक्रमातही दोन्ही राजे एकत्रच दिसून आले. यामुळे आता या दोन्ही मान्यवरांचे मनोमीलन होण्यास प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे. यासाठी शरद पवार यांनी घेतलेला पुढाकार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

Add Comment

Protected Content