नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसने डोकं वर काढलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २५ मेरोजी रात्री ९.३० वाजेपर्यंत ११ हजार ७१७ जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे.
सर्वाधिक रुग्ण गुजरात आणि महाराष्ट्रात असल्याचं दिसून आलं आहे. ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयानेही चिंता व्यक्त केली आहे. यासाठी अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला साथीचा आजार घोषित केलं आहे.
गुजरातमध्ये २८५९, महाराष्ट्रात २७७० आणि आंध्र प्रदेशमध्ये ७६८ ब्लॅक फंगसच्या रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी ट्वीट करत ही आकडेवारी दिली आहे. दिल्लीत ब्लॅक फंगसचे ६२० प्रकरणं असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या आकडेवारीत ही संख्या ११९ इतकी दिसत आहे.
कर्नाटकमध्ये ४८१, हरियाणात ४३६, तामिळनाडूत २३५, बिहारमध्ये २१५, पंजाबमध्ये १४१, उत्तराखंडमध्ये १२४, दिल्लीत ११९ आणि छत्तीसगडमध्ये १०३ रुग्ण आहेत. तर चंदीगडमध्ये ८३, गोव्यात १० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अनेक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ब्लॅक फंगसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. अंदमान निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश, आसाम, लडाख, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किममध्ये एकही रुग्ण नाही. तर पश्चिम बंगाल आणि दमन द्वीपची माहिती यात देण्यात आलेली नाही.
आतापर्यंत १९ राज्यांनी म्युकोरमायकोसिस या आजाराला साथीचे आथार अधिनियमांतर्गत अधिसूचित आजार घोषित केला आहे. या अंतर्गत सरकारी अधिकाऱ्यांना माहिती देणं बंधनकारक आहे.
कोरोना आजार बळावलेल्या तसेच त्यातून बरे झालेले मात्र मधुमेही, एड्सबाधित, कर्करोगग्रस्त, क्षयरोगी, किडनी विकार रुग्ण, डायलिसिसवर असलेले, आंतर अवयवांचे विकार असणारे तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजार होण्याची दाट शक्यता आहे. संसर्ग शरीराच्या कुठल्या भागाला झाला आहे, त्यावरून आजाराची लक्षणे दिसतात. डोळ्याच्या भागात याचा संसर्ग झाला, तर नाक सतत वाहत राहणे, नाक चोंदणे, डोळ्यांतून पाणी येणे, चेहरा सुजणे, डोळा लाल होणे, ताप येणे, डोके दुखणे, डोळ्यांना दोन प्रतिमा दिसणे अशी लक्षणे दिसतात.