देशात चोवीस तासात ९ हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले; ३३२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंतेत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापासून दररोज नऊ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहे. गेल्या चोवीस तासात देशात ९ हजार ९८७ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे, तर ३३२ जणांचा मृत्यू झालाय. ही वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे.

देशभरात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख ६६ हजार ५९८ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार २१५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.४९ टक्के आहे. सध्या एक लाख २९ हजार ९१७ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत ३३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७,४६६ वर पोहोचली आहे.

केंद्र सरकारच्या प्रसिद्धी विभागातील (पीआयबी) अधिकारी करोनाबाधित झाल्याने निर्जंतुकीकरणासाठी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्र बंद करण्यात आले आहे. श्रम शक्ती भवन मात्र मंगळवारपासून पुन्हा खुले केले जाणार आहे. कामगार कल्याण मंत्रालयातील दोन अधिकारी बाधित झाल्यानंतर श्रम शक्ती भवन बंद करण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगातील अधिकारीही करोनाबाधित झाला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव प्रीति सुदन यांनी दहा राज्यांमधील ३८ जिल्हाधिकारी व ४५ महापालिका आयुक्तांशी चर्चा करून करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यात महाराष्ट्र, तेलंगण, तमिळनाडू, राजस्थान, हरयाणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश होता. अधिकाधिक नमुना चाचण्या घेणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, विलगीकरण केंद्रे व अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Protected Content