अभिनेत्री मालवी मल्होत्रावर मुंबईत प्राणघातक हल्ला

मुंबई: वृत्तसंस्था । अभिनेत्री मालवी मल्होत्रावर मुंबईत प्राणघातक हल्ला करण्यात आला. ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

योगेश असे हल्लेखोराचे नाव असून, त्याने स्वतःची निर्माता म्हणून ओळख करून दिली होती. वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार, योगेशने मालवीवर चाकूने चार वार केले. तिची प्रकृती आता स्थिर आहे.

अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी योगेश महिपाल सिंह याच्यासोबत फेसबुकद्वारे ओळख झाली होती. कामानिमित्त त्याला फक्त एकदाच भेटली होती. सोमवारी ती घराबाहेर पडली. त्यावेळी हल्लेखोर कार घेऊन बाहेर थांबला होता. त्याने मालवीला भर रस्त्यात अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने विरोध केला. त्यावर त्याने तिच्यावर चाकूहल्ला केला. नंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.

मालवी मल्होत्रा हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी योगेशविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधून महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. मूळची हिमाचल प्रदेशातील असलेल्या मालवी हिने काही बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले आहे.

Protected Content