नवी दिल्ली : वृत्तसंस्था | देशात कोरोना संक्रमितांची संख्या ७५ लाखांच्या घरात पोहचलीय. आत्तापर्यंत ६५ लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ८८ टक्क्यांवर पोहचलीय. भारतात अॅक्टीव्ह केसेसची ८० हजारांहून कमी आहे.
देशात गेल्या २४ तासांत संक्रमणाचे ६१ हजार ८७१ रुग्ण आढळले आहेत तर १०३३ जणांचा मृत्यू झाला आहे. हाच आकडा शनिवारी ६२ हजार २१२ वर होता तर मृत्यूचा आकडा ८३७ वर होता.
गेल्या २४ तासांत ७२ हजार ६१४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याचं समोर आलंय. नवीन संक्रमितांपेक्षा आजारातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
देशातील एकूण संख्या ७४ लाख ९४ हजार ५५१ वर पोहचलीय. ७ लाख ८३ हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकूण ६५ लाख ९७ हजार २०९ लोकांनी या आजाराला मात दिलीय. देशात आत्तापर्यंत १ लाख १४ हजार ३१ जणांनी प्राण गमावलेत.
गेल्या २४ तासांत ज्या पाच राज्यांतून सर्वाधिक रुग्ण समोर आलं त्यामध्ये महाराष्ट्र (१०,२५९), केरळ (९०१६), कर्नाटक (७१८४), तामिळनाडू (४२९५) आणि पश्चिम बंगालल (३८६५) या राज्यांचा समावेश आहे. सर्वाधिक म्हणजेच, ४६३ मृत्यू महाराष्ट्रात नोंदवण्यात आले आहेत. हीच संख्या उत्तराखंडात ९५, कर्नाटकात ७१, पश्चिम बंगालमध्ये ६१ आणि तामिळनाडूमध्ये ५७ वर आहे.
गेल्या २४ तासांत देशात एकूण ९ लाख ७० हजार १७३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत ९ कोटी, ४२ लाख, २४ हजार १९० नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय.