देशमुखांनंतर आता नितीन राऊत ईडीच्या रडारवर

 

 

नागपूर: वृत्तसंस्था । राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यानंतर आता ऊर्जा मंत्री नितीन राऊतही ईडीच्या रडारवर येण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

रेती, कोळसा आणि जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी नितीन राऊत यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. तरुण परमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राऊत यांची ईडीकडून चौकशी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

अॅड. तरुण परमार यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडे तक्रार केली आहे. या दोन्ही नेत्यांवर अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेती, कोळसा, जमिनीत गैरव्यवहार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. परमार यांच्या या तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन ईडीने परमार यांना समन्स बजावून मुंबईला जवाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं.   ईडीला पुरावे दिल्याचा दावा परमार यांनी केला आहे.

 

परमार यांनी 28 जून रोजी ईडीला महत्त्वाची कागदपत्रे दिली आहेत. त्यांची ईडीने तीन तास चौकशीही केली.  त्यांच्याकडून येत्या 5 जुलै रोजी अधिक कागदपत्रे घेण्यात येणार आहेत. त्यासाठी परमार यांना पुन्हा ईडीकडून बोलवणं येण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली.

 

तरुण परमार हे नागपूरमधील वकील आहेत. ते केंद्र सरकारच्या एमएसएमई विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी राऊत यांच्यासह अनिल देशमुख यांच्याविरोधातही तक्रार केली आहे. तसेच या घोटाळ्यात राऊत यांचा मुलगाही असल्याचा दावा परमार यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

 

नितीन राऊत  यांनी   अधिकाऱ्यांशी संगनमत करून अपहार केल्याची तक्रार ईडीकडे दाखल करण्यात आली आहे. यावर  माजी अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केवळ तक्रारच महत्त्वाची नाही. यासंबंधी कागदपत्रे व निश्चित पुरावे असल्याशिवाय ही चौकशी गंभीर आहे, असं म्हटलं जाऊ शकत नाही, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. तर, अशा प्रकारच्या तक्रारी नियमितपणे होत असतात. या देशात कुणीही कुणाची तक्रार करू शकतो. यंत्रणा त्या संदर्भात तपास करत असतात, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परमार यांच्या आरोपावरून भाजपवरच सवाल केला आहे. परमार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यावर आरोप केले होते. त्यावेळी ईडी किंवा सीबीआय आडवी येत नव्हती. फडणवीस त्यावेळी प्रत्येकाला निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट देत होते, असं सांगतानाच सध्या मोदींचे सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून त्यांना बोथट करण्याचे पाप करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

 

 

Protected Content