नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने मेघालय, आसाम, बांगलादेश सीमेवर मोठं ऑपरेशन केलं. या ऑपरेशनमध्ये उल्फाचा (आय) उप कमांडर इन चीफ दृष्टि राजखोवा हाती लागला आहे. लष्कराने या ऑपरेशनमध्ये दृष्टि राजखोवा आणि त्याच्या चार साथीदारांना आत्मसमर्पण करायला भाग पाडले.
एसएस कॉरपोरल वेदांता, यासीन असोम, रोपज्योती असोम आणि मिथुन असोम यांनी भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. खात्रीलायक टीप मिळाली होती, त्या आधारावर हे ऑपरेशन करण्यात आले.
वाँटेड लिस्टमध्ये दृष्टि राजखोवाचे नाव होते. भारतीय यंत्रणा बऱ्याच काळापासून त्याच्या मागावर होत्या. आसामच्या खालच्या भागामध्ये तो कारवाया करत होता. दृष्टि राजखोवाचे आत्मसमर्पण हा उल्फाचा (आय)साठी मोठा झटका आहे. हे ऑपरेशन करुन भारतीय लष्कराने आसाममध्ये शांतता, स्थिरता टिकवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले आहे.