जळगाव प्रतिनिधी । येथील दूध फेडरेशनच्या दूध वाहतुकीच्या वाहनातून १३० कॅरेट चोरून नेल्याची घटना घडली होती. शहर पोलिसांच्या डी बी पथकाने तपासातून शोध घेत सोमवारी रात्री संशयित आरोपीस मुद्देमालासह अटक केली आहे. सोनू उर्फ विठठल अशोक लोंढे वय 24 रा.राजमालती नगर असे आरोपीचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सूरज उर्फ मिथुन साहेबराव सुरवाडे (वय-२२) हे भारतनगर येथे कुटूंबासह वास्तव्यास आहे. सूरज दूध फेडरेशनचे वाहन क्रमांक (एमएच १९ वाय ०२३८) वर चालक म्हणून कार्यरत आहे. २५ रोजी दिवसभर त्यानी यावल व रावेर तालुक्यात दुध केंद्रावर दूध वाटप केले. रात्री १० वाजता त्यांच्या ताब्यातील वाहन दूध फेडरेशनसमोर लावून सूरज घरी निघून गेले.दुसऱ्या दिवशी २६ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ९.३० वाजता त्यानी गाडीत दुधाच्या पिशव्या भरल्या. नंतर ही गाडी घेऊन ते दूध फेडरेशनच्या गेटवर गेले. या गाडीतील कॅरेट मोजले असता गाडीमध्ये फक्त ८८ कॅरेट मिळून आले. १३० कॅरेट त्यात कमी असल्याचा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी चालक सूरज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात ०३ रोजी भादवी कलम ३७९ प्रमाणे अज्ञात व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दूध फेडरेशन येथे अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने या गुन्ह्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी केली होती. त्या नुसार उप अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण निकम यांनी पथक नेमले होते. कँरेट चोरीबाबत डीबी पथकातील पोलीस नाईक भास्कर ठाकरे, पोलीस कान्स्टेबल रवींद्र साबळे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर डीबी पथकातील सहायक फौंजदार वासुदेव सोनवणे, हेड कान्स्टेबल विजय निकुंभ, पोलीस नाईक अक्रम शेख, पोलीस कान्स्टेबल सुधीर साळवे, पोलीस कान्स्टेबल रतन गीते, पोलीस कान्स्टेबल तेजस मराठे, पोलीस कान्स्टेबल योगेश इधाटे यांनी तपासचक्रे फिरवून सोनू उर्फ विठ्ठल लोंढे याला सोमवारी रात्री ताब्यात घेत चौकशी केली असता त्या गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेले १३० कॅरेट रुपये ३९ हजार किंमतीचे त्याने काडून दिला. मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.