दिव्यांगांची पतंग उडाली उंच, उडान पतंगोत्सवाने आणली रंगत !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘उडी उडी जाय, दिल की पतंग तेरी उडी उडी जाय’ म्हणत एकाहून एक आकर्षक पतंग उडवत गीत व संगीताच्या तालावर दिव्यांग बालकांनी ठेका धरला होता. रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशनने महापौर जयश्री महाजन यांच्या सहकार्याने यंदाचा ६ वा उडान पतंगोत्सव पार पडला. पतंगोत्सवात ‘उडान’ संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तसेच जळगावकर नागरिकांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला.

मकरसंक्रांती सणानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मणियार मैदानावर रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशनद्वारे महापौर जयश्री महाजन यांच्या सहकार्याने शनिवार १४ रोजी पतंगोत्सव घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ.शांताराम सोनवणे, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, ऍड.जमील देशपांडे, नगरसेविका ऍड.शुचिता हाडा, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रा.राकेश चौधरी यांची उपस्थिती होती. उडाणच्या संचालिका हर्षाली चौधरी यांनी प्रास्ताविक सादर करताना संस्थेच्या उद्दिष्टांची आणि कार्याची माहिती दिली.

मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या पतंगोत्सवात उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या ७० विद्यार्थ्यांनी गाण्याच्या तालावर मनसोक्त पतंग उडवत विविध गीतांवर नृत्य करून आनंद लुटला. त्यांच्यासोबत त्यांचे पालक आणि नागरिक देखील उपस्थित होते. याप्रसंगी सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी सेल्फी घेत उत्साह दाखविला. तसेच सर्वांनी एकमेकांना तिळगुळ देत भोगी व मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. उपक्रमासाठी हेतल पाटील, जयश्री पटेल, सोनाली भोई, देवकी महाजन, प्रतिभा पाटील, महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content