दिवंगत पोलीस अमलदारांच्या १६ पाल्यांना अनुकंपावर दिले नियुक्तीपत्र

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलात कर्तव्यावर असतांना दिवंगत झालेल्या पोलीस अमलदार यांच्या १६ पाल्यांना अनुकंपा धोरणानुसार ‘पोलीस शिपाई’ पदावर पोलीस ‘स्थापना दिवस (रेझिंग डे)’ निमित्त नियुक्तीपत्राची सुखद भेट देण्यात आली.

शासकीय सेवेत असताना दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांचे वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी अनेक वर्ष प्रतीक्षेत राहावे लागते, परंतु अलीकडे शासनाने अनुकंपा भरतीची मर्यादा वाढविल्याने शासन नियमाचे त्वरेने पालन करून जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पोलीस दलातील दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांचे वारसांना जलद गतीने अनुकंपा उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवून सोमवारी २ जानेवारी २०२३ रोजी १६ उमेदवारांना जळगाव जिल्हा पोलीस दलात ‘पोलीस शिपाई’ पदावर नियुक्ती आदेश पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.

पोलीस ‘स्थापना दिवस (रेझिंग डे)’ व नववर्षाची भेट दिली. यावेळी उपस्थित नवनियुक्त उमेदवार यांना पोलीस दलातील कर्तव्याबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. भरती प्रक्रियातील कामकाजासाठी मेहनत घेणारे पोलीस उप अधीक्षक संदीप गावित, कार्यालय अधीक्षक प्रवीण पवार, वरिष्ठ लिपिक योगेश रावते, दीपक जाधव, सुनील निकम, लिपिक देविदास बाविस्कर आस्थापना शाखा पोलीस अधीक्षक जळगाव यांचे कौतुक केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक संदीप गावित, कुणाल सोनावणे, कार्यालय अधीक्षक प्रवीण पवार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक कैलास नागरे आदी उपस्थित होते.

Protected Content