दिल्लीतील स्फोटाच्या तपासासाठी इस्रायलहून आले मोसादचे पथक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासासंदर्भात मोसादच्या पथकाने बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

दोन्ही देशाच्या पथकांनी या बॉम्बस्फोट तपासात आतापर्यंत झालेली प्रगतीची परस्परांना माहिती दिली. नवी दिल्लीत २९ जानेवारीला इस्रायली दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला होता.

भारतात एनआयए या स्फोटाचा तपास करतेय, तर इस्रायलच्या यंत्रणाही त्यांच्या बाजूने आरोपींचा शोध घेत आहेत. मोसाद ही इस्रालयची गुप्तहेर संघटना असून जगातील सर्वात धोकादायक गुप्तहेर संघटना अशी मोसादची ओळख आहे. प्राथमिक तपासातून या बॉम्बस्फोटामध्ये इराणचा हात असल्याचे संकेत मिळत आहेत.

तपासात भारतीय यंत्रणांना मदत करण्यासाठी मोसादचे पथक खास तेल अवीवरुन भारतात आले आहे. वेगवेगळया सोशल मीडिया अकाऊंटवरुन टेक्निकल डाटा गोळा केला जातोय. तपासामध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करु, इस्रायलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी स्फोटानंतर सांगितले होते. दूतावासाबाहेरील हा स्फोट कमी तीव्रतेचा होता. त्यात कोणाचाही मृत्यू किंवा कोणी जखमी झाले नाही. फक्त पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या. पण या स्फोटामागे संदेश देण्याचा एक निश्चित हेतू होता.

बॉम्ब आणि घटनास्थळाच्या प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीतून PETN प्रकारची स्फोटक वापरण्यात आल्याचं सुरक्षा दलातील सूत्रांनी सांगितलं. PETN ही लष्कराकडून वापरली जाणारी स्फोटक आहेत. ही स्फोटक सहज उपलब्ध होत नाहीत. यापूर्वी अल कायदा सारख्या संघटनांनी बॉम्ब बनवण्यासाठी PETN चा वापर केला होता.

तपासकर्त्यांना घटनास्थळावरुन “Hi-Watt” 9 वोल्ट बॅटरीचे काही अवशेषही सापडले आहेत. याआधी इंडियन मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाने बॉम्ब बनवण्यासाठी अशा प्रकारच्या बॅटरीचे वापर केला होता, असे सूत्रांनी सांगितले. इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी बॉम्ब बनवण्यासाठी सहजतेने उपलब्ध होणाऱ्या अमोनियम नायट्रेटचा वापर करायचे. डॉ. अब्दुल कलाम मार्गावर इस्रायली दूतावासाचे कार्यालय आहे. इथे एका मोठया फुलदाणीमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता.

 

Protected Content