जळगाव, लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली असून जिल्ह्यात भडगाव २, रावेर आणि पारोळा येथे प्रत्येकी एक अशा केवळ ४ रुग्णावर उपकार सुरु आहेत. या रुग्णांना देखील लवकरच सुटी देण्यात येणार असल्याचे या आठवड्यात जिल्हा कोरोनामुक्त होण्याची चिन्हे दिसून येत असून गेल्या सप्ताहापासून नव्याने एकही रुग्णाची नोंद झालेली नाही, हि जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापूर्वी मार्च च्या तिसऱ्या सप्ताहाच्या अखेरीस जळगाव शहरात मेहरूण परिसरात कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. जिल्हा परिसरात आतापर्यत १७ लाख ५९ हजार ५६२ अहवाल संसर्ग तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १६ लाख ५ हजार ९३१ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले होते. २०६३ अहवाल अन्य आजारांचे रुग्ण आढळले आहेत तर २७ अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७ अक्टीव्ह कन्टेनमेंट झोन आहेत. दोन वर्षात संसर्गाच्या तीन लाटांमुळे १ लाख ५१ हजार ५४१ संसर्ग बाधित रुग्णावर विविध ठिकाणी उपचार करण्यात आले असून त्यापैकी १ लाख ४८ हजार ९४६ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. तर २५९१ रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची नोंद आहे.
नागरिकांनी स्वतःहून लसीकरण करून घ्यावे –
जिल्ह्यात संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान १६ जानेवारीपासून संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात ९२ तर दुसऱ्या टप्प्यात ७५ टक्क्याच्या जवळपास लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच १५ ते १७ वर्ष वयोगटातील २ लाख २५ हजार लाभार्थ्यापैकी २ लाख १५ हजारांहून अधिक लसीकरण टप्पा पार झाला आहे. तर १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी कार्बोवेक्स लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या नागरिकांचे तसेच १५ ते १७ आणि १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांनी स्वतःहून जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी.जमादार, जिल्हा लसीकरण समन्वयक यांनी केले आहे.