धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील अंजनविहिरे गावात काही एक कारण नसताना दारूच्या नशेत एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत बैलगाडीचे शिंगाड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात बुधवार ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील अंजनविहिरे येथे शरद दगडू कोळी (वय-४३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता शरद कोळी हे घरी असताना संशयित आरोपी नितीन समाधान सोनवणे रा. बांभोरी ता. धरणगाव हा दारू पिऊन त्या ठिकाणी आला. त्यानंतर शरद कोळी यांना जोरात ढकलून देऊन जमिनीवर पाडले तसेच बैलगाडीचे लाकडी शिंगाडे डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या शरद कोळी यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी नितीन समाधान सोनवणे यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण निकुंभ करीत आहे.