इस्लामाबाद, वृत्तसंस्था । १९९३ मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा समावेश निर्बंध लादण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत असल्याचे निश्चित केल्यानंतर पाकिस्तानने दाऊदच्या पाकमधील वास्तव्याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या तपशीलांच्या आधारावर निर्बंध लादण्यात आलेल्या ८८ दहशतवादी गट व त्यांच्या म्होरक्यांची यादी तयार करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी या यादीत दाऊद इब्राहिमच्या घराचा पत्ता दिला होता.
पॅरिसस्थित आर्थिक कृती गटातर्फे काळ्या यादीत टाकले जाण्यापासून वाचण्यासाठी पाकिस्तानने शनिवारी बंदी घालण्यात आलेले ८८ दहशतवादी गट व त्यांच्या म्होरक्यांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले. या यादीमध्ये दाऊदसह जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफीझ सईद, जैश-ए-महंमदचा म्होरक्या मसूद अझर यांचाही समावेश आहे.
दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांची संपत्ती जप्त करणे आणि बँक खाते सील करण्याचे आदेश पाकिस्तान सरकारने दिले आहेत. पॅरिस येथील ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ या संस्थेने जून २०१८ मध्ये पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवले होते. पाकिस्तानने तातडीने २०१९ पर्यंत दहशतवादी संघटनांविरोधात टेरर फंडिंगसंदर्भात कृती आराखडा पूर्ण करण्याची सूचना केली होती. मात्र, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे कारवाईची मुदत वाढवण्यात आली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी काढलेल्या परिपत्रकामध्ये निर्बंध यादीतील माहिती ही संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या तपशीलांनुसार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या यादीतील काही दहशतवाद्यांचे देशातील वास्तव्य पाकने मान्य केल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त हे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचेही या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी कृत्यांना, दहशतवाद्यांना पाठिंबा मिळतो, असा आरोप होत असतो. आता पाकिस्तानच्या या सारवासारवीमुळे पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेवर प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा विश्वासू साथीदार एजाज लकडावालाने मुंबई पोलिसांच्या चौकशीत यावर्षीच्या जानेवारी महिन्यातच दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली होती. १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला दाऊद आजही कराचीतच आहे, असे सांगतानाच दाऊदच्या दोन घरांचे पत्ते लकडावालाने पोलिसांना दिले होते.