मुंबई : वृत्तसंस्था । उच्च न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न आणि केंद्र सरकारची परीक्षांबाबतची भूमिका या विषयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी येत्या दोन दिवसांत चर्चा होणार असून त्यावेळी परीक्षांच्या मुद्द्यांवर सविस्तर विश्लेषण व निर्णय होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
गेल्या महिन्यात राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीच्या परीक्षा मात्र घेतल्या जातील असं देखील सांगितलं होतं. सीबीएसई बोर्डानं देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे एकूणच राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत नेमकं काय होणार? या संभ्रमात विद्यार्थी आणि पालकही असताना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
सोमवारी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं. त्यामुळे या परीक्षांबाबत येत्या काही दिवसांतच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं नमूद केलं. “सगळ्यांनाच माहिती आहे की तिसऱ्या लाटेची आपण चर्चा करत आहोत. त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होण्याची शक्यता आहे. कुटुंबात पॉझिटिव्ह असेल, तर तिथल्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल हे समजून घेतलं पाहिजे. मुलं वर्षभरापासून या परीक्षेसाठी तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांचं हित, त्यांचं शारिरीक आणि मानसिक आरोग्य बघूनच त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये देखील संभ्रम आणि घबराटीचं वातावरण आहे”, असं त्या म्हणाल्या.