अरे व्वा… जळगाव जिल्ह्यात १०५७ रूग्णांची कोरोनावर मात !

जळगाव प्रतिनिधी । आज दिवसभरात जिल्ह्यातील ११० कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रूग्णांची संख्या १ हजार ५७ इतकी झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील उपचार घेणार्‍या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या पेशंटची संख्या जास्त झाली आहे.

एकीकडे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असताना गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनावर मात करणार्‍या रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब आहे. या पार्श्‍वभूमिवर, जिल्ह्यात आज आणखी ११० जण बरे झाल्याने आपापल्या घरी परतले आहे. यामध्ये डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि रूग्णालयातील काही खाटा कोविड रूग्णांसाठी अधिग्रहीत केल्यानंतर येथे उपचार केलेल्या तीन महिन्याची बालीका या रूग्णालयातील पहिली कोरोनामुक्त ठरली आहे हेही विशेष. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कोविडसेंटरमधून मान्यवरांच्या उपस्थितीत आज डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधित रूग्णांना वेळेवर आवश्यक ते उपचार तातडीने मिळावेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहेत. तर, जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे प्रमाण वाढत असल्याने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.

त्याचबरोबर राज्य शासनानेही बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टर व परिचारिकांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करून रूग्णांना वेळेवर उपचार व औषधी मिळत असल्याने शिवाय नागरिकही वेळेत तपासणीसाठी येत असल्याने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रूग्णालयात रूग्णांना चहा, नाश्ता, जेवण आदि सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रूग्णालय व डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि रूग्णालयातील काही बेडस् कोविड रूग्णांसाठी अधिग्रहीत केले आहे. गणपती व गोल्ड सिटी हे हॉस्पिटल सर्व सुविधांसह कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहीत केली आहे. शिवाय जिल्ह्यातील ३३ हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत केला असून याठिकाणी नॉन-कोविड रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागू नये तसेच रुग्णांना तातडीने व वेळेवर उपचार मिळावेत याकरिता जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ७८ कोविड केअर सेंटर ३६ कोविड हेल्थ सेंटर तर २४ कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आली आहे. याठिकाणी रुग्णांचे स्क्रीनिंग करणे, संशयित रूग्णांना दाखल करून घेणे, त्यांचेवर उपचार करणे, आवश्यकता भासल्यास क्वारंटाईन करणे, स्वॅब घेणे, पॉझिटिव्ह रुग्णांवर तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील १०५७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

जळगाव जिल्ह्यात तालुकनिहाय आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची माहिती.
जळगाव शहर- २२५
जळगाव ग्रामीण- २२
भुसावळ- १७६
अमळनेर- १३२
चोपडा-८०
पाचोरा-२८
भडगाव- ७८
धरणगाव- ३४
यावल -४५
एरंडोल- ३१
जामनेर-३७
रावेर-७४
पारोळा- ६३
चाळीसगाव- १६
मुकताईनगर -७
बोदवड -८
इतर जिल्ह्यातील- १ याप्रमाणे एकूण १०५७ रूग्णाचा समावेश आहे.

येथील महाविद्यालयात दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ रामानंद व त्यांची टीम तर कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आवश्यक त्या सुविधा व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी इन्सिडन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर, महापालिका क्षेत्रात आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी, महसुल, पोलीस दलाचे कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत असून त्यांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचेही चांगले सहकार्य लाभत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण कोरोनामुक्त होत आहे.

असे असले तरी नागरिकांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित रहावे. अनावश्यक गर्दी टाळावी. सुरक्षित अंतर राखावे. मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी केले आहे.

Protected Content