मोठी बातमी : दोन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्हा हद्दपारची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी यासह १३ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (वय- २३) व गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे (वय- २०), रा. कांचननगर यांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसननजन पाटील यांनी दिली.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आकाश सपकाळे व गणेश सोनवणे या दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत, मारामारी, मालमत्तेचे नुकसान यासह वेगवेगळे १३ गंभीर गुन्हे आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (वय- २३) व गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे (वय- २०), रा. कांचननगर यांच्यावर दाखल करण्यात आले आहे. हे दोघेजण टोळीने गुन्हे करायचे. त्यामुळे नागरिकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक फौजदार संजय शेलार, पोहेकॉ अश्वीन हडपे, परिष जाधव, पोकॉ राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, किरण वानखेडे यांनी दोघांच्या हद्दीपारीचा प्रस्ताव पाठविला. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी प्रस्तावाची चौकशी केली.

यात टोळी प्रमुख आकाश सपकाळे व सदस्य गणेश सोनवणे या दोघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिले. या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे यांनी पाहिले.

Protected Content