जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल नाकाजवळ शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ट्रकचालकाला अज्ञात दोन जणांनी दुचाकीवर येवून दमदाटी करत त्यांच्याजवळून २ हजारांची रोकड आणि गुगल-पे ने १९ हजार असे एकुण २१ हजार रूपये जबरी घेवून पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, देवेंद्र कुमार रामद्रश पटेल (वय-३८) रा. छत्रगड जि.रेवा मध्यप्रदेश हा ट्रक चालक आहे. शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी देवेंद्र कुमार हा त्याच्या ताब्यातील १४ चाकी ट्रक क्रमांक (युपी ६३ टी ९७१८) ने जळगावकडून नागपूर येथे जाण्यासाठी नशिराबाद टोल नाक्याजवळून जात होता. त्यावेळी टोल नाक्याजवळून जात असतांना अज्ञात दोन जणकाळ्या दुचाकीने आले. त्यांनी ट्रकचा रस्ता आडविला आणि चालक देवेंद्रकुमार याला ट्रकच्या खाली ओढून त्याला दमदाटी करत खिश्यातील २ हजारांची रोकड काढली तसेच एकाने ट्रकचालकाच्या गुगल पे वरून १९ हजार रूपय ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर दोघे पसार झाले. ही घटना घडल्यानंतर ट्रकचालक याने पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहे.