थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास मारहाण

जळगाव, प्रतिनिधी | वीज बिलाची थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तीसह इतर दोघांविरोधात शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 

पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार, महावितरणचे पथक आज दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बळीराम पेठे येथे थकीत वीजबिल वसुलीचे काम करत होते. पथकात रोहित गोवे (सहाय्यक अभियंता), राकेश वंजारी (प्रधान तंत्रज्ञ), सुनील महिरे (वरिष्ठ तंत्रज्ञ), वंदना वानखेडे (वरिष्ठ तंत्रज्ञ), दिनेश बडगुजर (वरिष्ठ तंत्रज्ञ), सागर पाथरवट (वरिष्ठ तंत्रज्ञ) यांचा समावेश होता. बळीराम पेठेत गंगाराम देवरे यांच्या घरात गणेश वसंत कुलकर्णी हे भाडेकरू राहतात. पथक जेव्हा थकबाकी वसुलीसाठी गणेश कुलकर्णी यांच्याकडे गेले असता कुलकर्णी याने   पथकातील कर्मचाऱ्यांकडे थाबकाकी भरण्यास असमर्थता दाखविली. यानंतर पथकातील वरिष्ठ तंत्रज्ञ सागर पाथरवट यांनी कुलकर्णी याच्या घराचे वीज मीटर काढून घेत मेन सर्व्हिस वायर देखील काढून घेतली. यावेळी गणेश कुलकर्णी याने पथकास शिवीगाळ करत हातात दगड घेवून सागर पाथरवट यांच्या अंगावर धावून गेला. त्याच्या सोबत असलेल्या दोघांपैकी एका व्यक्तीने सागर यांना धक्काबुक्की करत चापट मारली व शर्टाचा खिसा ओढून फाडला. तर दुसऱ्या व्यक्तीने पथकास शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. गणेश कुलकर्णी व इतर दोघा अज्ञात व्यक्तींविरोधात शहर पोलिसात सागर पाथरवट यांच्या फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Protected Content