जळगाव प्रतिनिधी । जळगावच्या मेहरूण भागातील रहिवासी असणारा व्यक्ती कोरोनाच्या पॉझिटीव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संबंधीत रूग्णाच्या कुटुंबासह तो गत काही दिवसांमध्ये नेमका कुणाच्या संपर्कात आला हे शोधण्याचे काम आता सुरू झाले आहे.
शहरातल्या मेहरूण परिसरातील ४९ वर्षाच्या व्यक्तीची कोरोना संसर्गाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर जिल्हाधिकार्यांनी मेहरूण परिसराला सील करण्याचे आदेश दिले असून याची रात्री तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्या रूग्णावर उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत. तथापि, संबंधीत व्यक्ती हा गेल्या दहा दिवसांपासून शहरात असून तो या दरम्यान अनेक जणांना भेटलेला आहे. त्याचे एकत्र कुटुंब असून यात १७ जणांचा समावेश आहे. यामुळे त्याच्या कुटुंबासह संपर्कात आलेल्यांची चाचणी घेऊन यातील निष्कर्षानुसार त्यांना उपचार सुचविण्यात येणार आहेत. अगदी चाचणी निगेटीव्ह असली तरी त्यांना होम क्वॉरंटाईनच्या माध्यमातून विलग ठेवले जाणार आहे.
हे देखील वाचा : शॉकींग : जळगावात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
यातील सर्वात मोठा धोका हा संबंधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांसाठी देखील आहे. गेल्या दहा दिवसात हा रूग्ण शहरात अनेकांना भेटलेला असल्याने त्यांना देखील संसर्गाची लागण झाली आहे का ? याची खातरजमा करणे आवश्यक आहे. यानंतर आरोग्य यंत्रणेने सुचविलेले उपाय त्यांना करावे लागणार आहेत.
हे देखील वाचा : कोरोनाची एंट्री : आता जळगावकरांची खरी परीक्षा !