जयपूर : वृत्तसंस्था । अचानक एसीबी अधिकारी घरी आले तर भंबेरी उडणं साहजिकच आहे. असाच धाडीचा बनाव करून भामट्यांनी राजस्थानमधील एका व्यवसायिक कुटुंबाला लुबाडलं आहे. ‘स्पेशल 26 स्टाईल लूट’ या चित्रपटासारखं तीन चोरट्यांनी राजस्थानात एका कुटुंबाल 23 लाखांचा चुना लावला आहे
राजस्थानची राजधानी जयपूर शहरात हिंदी चित्रपट ‘स्पेशल 26 स्टाईल लूट’ सारखं एका कुटुंबाला लुबाडलं गेल्याची घटना समोर आली आहे. जयपूरच्या एका व्यवसायिकाच्या घरात तीन इसमांनी अँटी करप्शन ब्यूरोचे अधिकारी सांगत छापा टाकला. त्यांनी संपूर्ण घर पिंजून काढलं. त्यांना घरात 23 लाख रुपये रोख रक्कम मिळाली. ते कारवाईच्या नावाने सर्व पैसे कार्यालयात घेऊन जातो सांगत फरार झाले. आरोपींनी दोन हार्डडिस्कही चोरी केल्याची घटना समोर आली आहे.
घटना जयपूरच्या जवाहरलाल नगर येथील सेक्टर सातमध्ये दीपक शर्मा यांच्या घरी घडली आहे. दीपक शर्मा हे व्यवसायिक आहेत. खोट्या एसीबी अधिकाऱ्यांनी घरात छापा टाकला तेव्हा फक्त दीपक यांचा मुलगा विनीत एकटा होता. तीन इसम घरी आले. घरात शिरताच क्षणी त्यांनी कारवाईच्या नावाने शोधाशोध सुरु केली. ते घरातील डब्बे वगैरे बघायला लागले. यावेळी त्यांना 23 लाख रुपये मिळाले. त्यांनी ते घेतले आणि तिथून ते फरार झाले.
या घटनेनंतर विनीतने आपले वडील दीपक शर्मा यांना फोन करुन माहिती दिली. त्याच्या वडिलांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डीसीपी अभिजीत सिंह यांच्यासह क्राईम ब्रांचची टीम देखील तिथे आली. सध्या पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
खोट्या एसीबी अधिकाऱ्यांना बघून विनीत घाबरला आणि त्याने स्वत:हून घरात 23 लाख रुपये असल्याची माहिती त्यांना दिली. मात्र, त्यानंतर त्याला खोट्या अधिकाऱ्यांच्या हालचालींवर संशय आला. त्यामुळे त्याने पोलिसांना याबाबत सूचना दिली, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
आम्ही लवकरच सीसीटीव्हीच्या आधारावर चोरट्यांना शोधून काढू, असं पोलिसांनी सांगितलं