तोंडापूर आणि भारुडखेडा परिसरात दारूबंद ; पोलीसदादाला महिलांनी बांधल्या राख्या

पहूर, ता जामनेर (वार्ताहर) येथील पोलीस स्थानकात अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. पहूर पोलिस स्थानक हद्दीतील तोंडापूर आणि भारुडखेडा येथे दारूबंद झाल्यामुळे कुटुंबात नेहमीच होणारे भांडण-तंटे संपुष्टात आले. त्यामुळे तेथील भगिनींनी पहूर पोलीस स्थानकात येऊन पोलीस दादांना कृतज्ञतेच्या भावनेतून राख्या बांधत रक्षाबंधन सण मोठ्या आनंदात साजरा केला.

 

 

आज राखी पौर्णिमेला दुपारी तोंडापूर येथील महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा ललिता रमेश भोई , सचिव सुनंदा पांडुरंग गवळी , इंदुबाई बेंडे , पद्माबाई पाडाळे , नंदाबाई गवळी , चंदाबाई गवळी , वेणूबाई इंगळे , द्वारकाबाई गवळी,सविताबाई लोखंडे, चंदाबाई लोखंडे ,लक्ष्मीबाई खरात,अलकाबाई दांडगे आदी महिलांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे , सहाय्यक फौजदार अनिल अहिरे ,जितूसिंग परदेशी, होमगार्ड जगदीश चौधरी यांच्यासह पोलीस बांधवांना राख्या बांधत आमच्या गावातील दारू कायमस्वरूपी अशीच बंद ठेवा अशी मागणी केली .यावेळी सर्व भगिनींनी पोलीस दादांना औक्षण करून दारूबंदीची भेट दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले . पहूर येथील पोलीस स्टेशनचे अधिकारी -कर्मचाऱ्यांनी सामाजिक भान जोपासत तोंडापूर आणि भारुडखेडा यासारख्या ग्रामीण भागात वेळोवेळी दारु अड्यांवर छापे मारून तेथील दारू विक्री बंद केली आहे .या अनोख्या भेटीमुळे भारावलेल्या भगिनींनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून पोलीस दादांप्रती कृतज्ञ भावना व्यक्त केले .या भगिनींसह पोलीस बांधवांचेही या अनोख्या रक्षाबंधना बद्दल परिसरातून कौतुक होत आहे .

Protected Content