तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी मेंदूतून काढला चेंडूएवढा ब्लॅक फंगस!

 

पाटणा : वृत्तसंस्था । बिहारच्या पाटण्यात एकाच्या मेंदूत ब्लॅक फंगसची शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली  त्याच्या मेंदूतून क्रिकेट चेंडूइतका मोठा ब्लॅक फंगस काढण्यात आला

 

इतका मोठा ब्लॅक फंगस बघितल्यानंतर डॉक्टरानाही धक्का बसला. मात्र शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र हे संकट ओसरत असलं तरी ब्लॅक फंगसचं संकट कायम आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना ब्लॅक फंगसची लागण होत आहे. ब्लॅक फंगसच्या महागड्या उपचारांचा खर्च ऐकून सर्वसामान्यांच्या पायाखालची वाळू सरकते. त्यामुळे अनेकांनी या आजाराची धास्ती घेतली आहे. या ब्लॅक फंगसमुळे अनेकांना जीवाला मुकावं लागलं आहे.

 

बिहारच्या पाटण्यातील एका ६० वर्षीय व्यक्तीला ब्लॅक फंगस हा आजार झाला होता. त्याच्या मेंदूत ब्लॅक फंगस झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी तात्काळ पाटण्यातील गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉ ब्रजेश कुमार यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांनी तीन तास शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत त्याच्या मेंदूतून क्रिकेट चेंडूएवढा ब्लॅक फंगस काढण्यात आला. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

 

पाटण्यातील व्यक्तीला कोरोनातून बरे झाल्यानंतर थकवा जाणवत होता. त्यानंतर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. तेव्हा डॉक्टरांची त्याची तपासणी केली असता त्याला ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं समोर आलं. ब्लॅक फंगस त्याच्या नाकातून मेंदूपर्यंत पोहोचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सुदैवाने त्याच्या डोळ्यांना काही इजा झाली नाही. “शस्त्रक्रिया खूपच गुंतागुंतीची होती. नाकावाटे ब्लॅक फंगस मेंदूपर्यंत पोहोचला होता. थोड्या प्रमाणात डोळ्यांना स्पर्श झाल्याचं दिसून आलं. तो मेंदूत वेगाने मोठा होत असल्याचं दिसून आल्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर तीस तास शस्त्रक्रिया केल्यानंतर तो ब्लॅक फंगस काढण्यात यश आलं”, असं डॉक्टरांनी सांगितलं.

 

Protected Content