तालुक्यातील म्हसावद येथे तरुणावर बिबट्याचा हल्ला

जळगाव प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे एक २५ वर्षीय सालदारावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी कि, आबा एकनाथ सोनवणे हे म्हसावद येथे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे़ त्यांचे म्हसावद-लमांजन शिवारात शेत आहे़ त्याचबरोबर नागदुली येथील मुळचा रहिवासी असलेला अनिल भील नामक हा तरूण त्यांच्याकडे अडीच ते तीन वर्षांपासून सालदारकी करीत आहे़ त्यामुळे तो शेतात राहतो़ शुक्रवारी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास अनिल हा बैलजोडी घेवून शेतात केळीची पाहणी करण्यासाठी जात होता. त्याचवेळी अचानक त्याच्या अंगावर बिबट्याने झडप घातली़ बिबट्याने केलेल्या हल्लयात त्याच्या हातासह डोक्याला दुखापत झाली.

अन् तो प्राण वाचविण्यासाठी झाडावर चढला
बिबट्याने हल्ला करताच अनिल भील याने कसे-बसे आपले प्राण वाचवून बाजूलाच असलेल्या नाल्यात उडी घेतली़ नंतर जवळच असलेल्या झाडावर चढून आपले प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला़ झाडावर चढताच त्याने आरडा-ओरड केली़ त्याचवेळी बिबट्याला पळवून लावण्यासाठी प्रयत्न केले़ काहीवेळानंतर गावातून काही ग्रामस्थ आले, तोपर्यंत अनिल याने बिबट्याला पळवून लावले होते़ हा प्रकार शेतमालक व ग्रामस्थांना कळताच त्यांनी त्वरित जखमी अनिल याला खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले़ त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे शेत मालक आबा सोनवणे यांनी सांगितले.

Protected Content