जळगाव : प्रतिनिधी । सर्वसमावेशक स्वयंरोजगार प्रोत्साहनासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. ते जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.
चोपडा, पाचोरा, भडगाव येथे उद्योजकता विकास केंद्र स्थापनेच्या अधिसूचना शासनाने जारी केलेल्या असून धरणगाव येथे उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली जाणार आहे या बाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी, सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध करुन स्थानिक तरुणांना स्वयं-रोजगाराकडे आकर्षित करुन सुक्ष्म व लघु उपक्रम स्थापित करणे हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा उद्देश आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. शासनाने जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचे ४९५ तर पंतप्रधान रोजगार निर्मितीचे १४४ उद्दिष्ट मुदतीत साध्य करण्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या
प्रास्ताविकात जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आर.आर. डोंगरे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे सुक्ष्म व लघु उपक्रम स्थापित करून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
यावर्षी कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या नागरिकांसाठी रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 15 तालुके रोजगार युक्त करण्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम तालुकानिहाय राबविण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ , आ.चंद्रकांत पाटील, मा. आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे, एम.आय.डी.सी. चे क्षेत्र व्यवस्थापक डी.जी. पारधी, जिल्हा उद्योगचे व्यवस्थापक आर.आर.डोंगरे, खादी ग्राम उद्योगाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी बाळकृष्ण चौधरी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे आनंद विद्यागर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.