रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील तांदलवाडी येथील प्रगतीशील शेतकरी प्रशांत महाजन यांचा जागतिक केळी परिषदेत सर्वोत्कृष्ट केळी उत्पादक पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
त्रिची येथे २२ ते २५ फेब्रुवारीच्या दरम्यान भारतीय कृषी संशोधन परिषद व त्रिची (तामिळनाडू ) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जागतिक केळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्वोत्कृष्ट केळी उत्पादकतेचा राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट बनाना ग्रोवर अवॉर्ड हा पुरस्कार तालुक्यातील तांदलवाडी येथील प्रगतिशील शेतकरी प्रशांत वसंत महाजन यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे महाजन हे तालुक्यातील तिसरे केळी उत्पादक शेतकरी ठरले आहे. त्रिची येथे २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या परिषदेतविविध देशातील ३०० च्यावर केळी संशोधक व शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. यात प्रशांत महाजन यांचा पुरस्कार देऊन सन्मान करणात येणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. के.बी. पाटील यांच्यासह तालुक्यातील काही मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रशांत महाजन यांना अतिशय मानाचा समजला जाणारा पुरस्कार मिळणार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.