जळगाव प्रतिनिधी । आंघोळीसाठी तलावात गेलेल्या १८ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह आज आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास सापडला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चेतन साहेबराव राठोड (१८) रा. रामदेववाडी ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. रामदेववाडी येथे चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावातील तरुण तलावात आंघोळीसाठी जातात. चेतन राठोड, नवल पांडूरंग राठोड व सागर धनराज राठोड असे तिघेजण तलावात शनिवारी आंघोळीसाठी गेले. चेतन याला पोहता येत नसल्याने तो खोल खड्डयात गेला अन् जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करायला लागला. हा प्रकार पाहून सागर व नवल दोघं जण मदतीला धावले, त्याशिवाय तलावाच्या दुसऱ्या काठावर मासेमारी करीत असलेलेल हौसीलाल भोई हे देखील धावून आले. मात्र तलाव खोल व गाळ खूप प्रमाणात असल्याने चेतन हाती लागला नाही.
चेतन पाण्यात बुडाल्याची माहिती रामदेववाडी व वावडदा गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेऊन तलावात शोध कार्य राबविले. रविवारी सकाळी चेतनचे नातेवाईक नानाभाऊ जेरी चव्हाण (रा.तळवण तांडा, ता.भडगाव) यांनी परत तलावात उडी घेऊन शोध मोहीम राबविली असता सकाळी ७ वाजता मृतदेह आढळून आला.
कुटुंबावर मोठे संकट
चेतन याच्या पश्चात वडील साहेबराव हरी राठोड, आई द्वारकाबाई, व लहान भाऊ नितीन बहिण चैताली समाधान चव्हाण विवाहित आहे. चेतनच्या मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सचिन मुंडे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.