मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना कुणाची यासाठी पुरावे द्यावे लागतात हे दुर्दैव असल्याचे नमूद करत हा पक्ष ठाकरेंचाच असल्याचे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले. तर जनता एकनाथ शिंदे यांची गाढवावरून धिंड काढणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला.
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलतांना फुटीरांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, निवडणूक आयोग पुरावे कसले मागते? महाराष्ट्रातील ११ कोटी जनता हाच शिवसेना आमची असल्याचा पुरावा आहे. सीमाप्रश्नाच्या आंदोलनातील हुतात्मे हा पुरावा आहे. राज्यातील शिवसैनिक हाच आमचा पुरावा आहे. विधानसभा अध्यक्षांनी फुटीर गटाला २४ तासांत शिवसेना म्हणून मान्यता दिली. लोकशाहीचा खून असताना कोणते पुरावे द्यायचे, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
खासदार राऊत पुढे म्हणाले की, राज्यात सत्याचा खून केला जातोय. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा पुरावा देईल आणि जनता त्यांची गाढवावरुन धिंड काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बाळासाहेबांचा आत्मा त्यांना कधीच माफ करणार नाही. याप्रसंगी त्यांनी फुटीर आमदारांवर अतिशय शेलक्या शब्दांमध्ये टिकास्त्र सोडले.