मुंबई (वृत्तसंस्था) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे विधान परिषदेच्या दोन जागांवर अडून बसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, असेच सुरु राहिल्यास निवडणूक लढणार नाही, असा निरोप उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांना दिल्याची माहिती समोर येत आहे.
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध लढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. मात्र काँग्रेसने दोन उमेदवार उभे केल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट आहे. परंतू निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी शिवसेनेची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंनी या संबंधित काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, काँग्रेस दोन जागा लढवण्यास ठाम राहिल्यास मी निवडणूक लढवणार नाही, असा निरोप देखील उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत शिवसेनेकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.