तरूणाची लाखो रूपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुम्हाला कमी व्याजदरात ऑनलाईन कार व बिजनेस लोन मंजूर करुन देण्याच्या बहाण्याने जळगाव शहरातील आव्हाणे शिवारातील तरुणाची २३ लाख २४ हजारांत फसवणूक झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जळगाव सायबर पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील मिराभाईदंर येथून एका महिलेला अटक केली आहे. पूजा सुनील चौहान, रा. मीरारोड, पूर्व मीराभाईदंर जि ठाणे असे अटकेतील महिलेचे नाव आहे. सोमवार, २० फेब्रुवारी रोजी सायबर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला असून फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी १८ लाख ६९ हजार रुपये हस्तगत केले आहे.

जळगाव शहरातील आव्हाणे शिवारातील पवार पार्कमध्ये साहील वसंतराव गाढे हा तरुण वास्तव्यास असून तो खासगी नोकरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. यादरम्यान साहील गाढे यांना पूजा चव्हाण तसेच मंगेश चव्हाण असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींचे फोन आले होते, ६० लाख रुपये लोन मंजूर करुन असे सांगत दोघांनी वेळोवेही वेगवेगळ्या टॅक्स, प्रोसेसिंगच्या तसेच इतर बहाण्याने साहील गाढे या तरुणाकडून २३ लाख २४ हजार रुपये उकळले होते. दोघेही आपली फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर साहिल गाढे यांनी संबंधितांना पैशांची मागणी केली होती, मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात होती, अखेर साहिल गाढे यांनी सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक दिगंबर थोरात, सचिन सोनवणे, गौरव पाटील, गौरव पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पेालीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी गुन्ह्यात तांत्रिक सहाय्य केले., यात संशयित मिराभाईंदर येथील असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलीस निरिक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक दिगंबर थोरात, राजेश चौधरी, महिला पोलीस नाईक स्वाती पाटील, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, यांचे पथक मिराभाईंदर येथे रवाना झाले होते, व १८ फेब्रुवारी रोजी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने पूजा चव्हाण हिला अटक केली होती, तिने गुन्हयाची कबूली दिली असून गुन्ह्यातील एकूण २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांपैकी एकूण १८ लाख ६९ हजार रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चारदिवसात पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Protected Content