चोपडा प्रतिनिधी । साहित्य हे आपल्या जगण्याला दिशा व जीवनाला योग्य वळण देते यामुळेच आजच्या भरकटलेल्या तरुणाईला दिशा देण्यासाठी विचारांचा प्रसार करणाऱ्या व वाचन संस्कृती जोपासणाऱ्या साहित्य संमेलनांची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन संदीप पाटील यांनी व्यक्त केले.
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘साहित्य संमेलन-दशा व दिशा’, मराठी साहित्य संमेलनांचे बदलते स्वरूप’, ‘मराठी साहित्य संमेलनाची फलश्रुती’, ‘मराठी साहित्य संमेलनातील दहशतवाद व जातीवाद’, ‘मराठी साहित्य संमेलनाची आवश्यकता’, ‘मराठी साहित्य संमेलने-काळ,आज आणि उद्या’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या चर्चासत्राचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे हे उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे, सौ.एम.टी.शिंदे, ए.बी.सूर्यवंशी, संदीप बी.पाटील, डी.एस.पाटील, डी.डी.कर्दपवार, सौ.एस.बी.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
या चर्चासत्राचे प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे यांनी केले. या चर्चासत्रात एकूण २२ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. यावेळी कोळी सपना देवराम (टी.वाय.बी.ए.) या विद्यार्थिनीने ‘साहित्य संमेलन-दशा व दिशा’ या विषयवार आपले मत मांडले. बाविस्कर प्रेरणा सुनील (टी.वाय.बी.ए.) या विद्यार्थिनीने ‘साहित्य संमेलनातील वाद व दहशतवाद’ या विषयावर आपले विचार मांडले.
धनश्री पंकज महाजन (११ वी वाणिज्य) या विद्यार्थिनीने ‘साहित्य संमेलनाची फलश्रुती’ या विषयवार आपले विचार प्रकट केले. सोनवणे मयुरी योगेश (११ वी वाणिज्य) या विद्यार्थिनीने ‘मराठी साहित्य संमेलनांचे बदलते स्वरूप’ या विषयावर विचार व्यक्त केले. साळुंखे मयुरी प्रवीण (११ वी वाणिज्य) या विद्यार्थिनीने ‘मराठी साहित्य संमेलने- इतिहास व आवश्यकता’ यावर आपले मत मांडले. पंडित प्राची विष्णू (११ वी वाणिज्य) या विद्यार्थिनीने ‘मराठी साहित्य संमेलनातील वाढते वाद’ या विषयावर वाढत्या वादांबाबत खंत व्यक्त केली. माळी प्रतिभा लकीचंद (११ वी वाणिज्य) या विद्यार्थिनीने ‘मराठी साहित्य संमेलनांची आवश्यकता’ या विषयावर विचार मांडून आजच्या साहित्य संमेलनांची आवश्यकता विचारांच्या व साहित्य प्रचाराच्यासाठी किती महत्वाची आहे हे सांगितले. चौधरी रश्मी जितेंद्र (११ वी वाणिज्य) या विद्यार्थिनीने ‘मराठी साहित्य संमेलने-काल, आज आणि उद्या’ यावर आपले मत मांडले. पाटील रोशनी अरुण (११ वी वाणिज्य) या विद्यार्थिनीने ‘साहित्य संमेलनांची ऐतिहासिक पार्श्वभूमी’ याची माहिती सांगितली. पाटील वैष्णवी महेश (११ वी वाणिज्य) या विद्यार्थिनीने ‘साहित्य संमेलनातील ठराव’ यावर मत मांडले. शिंपी हर्षल दगडू (एस.वाय.बी.ए.) या विद्यार्थ्याने ‘आजच्या साहित्य संमेलनांची भूमिका’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले तसेच पाटील भाग्यश्री सुधाकर (एस.वाय.बी.ए.) या विद्यार्थिनीने ‘आजच्या साहित्य संमेलनांची दिशा’ या विषयावर आपले मत व्यक्त केले.
यावेळी या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, साहित्य वाचनातून मस्तक व बुद्धी यांची उत्तम मशागत होते. म्हणूनच आजच्या तरुणाईने साहित्य संमेलनांना जाऊन तेथील विचार ऐकावेत व तेथील ग्रंथ प्रदर्शने, चर्चा, परिसंवाद, कविसंमेलने यांचा आस्वाद घेतल्यास त्यांना वैचारिक भान येऊन विचारांत प्रगल्भता निर्माण होईल. याप्रसंगी त्यांनी नारायण सुमंत यांची ‘आम्ही आडनावाचे शेतकरी, इंद्रजीत भालेराव यांच्या ‘शिक बाबा शिक लढायला शिक’ आणि शेतकऱ्यांचे दुख व्यक्त करणारी ‘मालनी व मालनी’ या कविता सादर करून शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्याविषयी चिंता व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार जी.बी.बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.एस.बी.पाटील व शाहीन पठाण यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.