जळगाव (प्रतिनिधी) भारत हा तरुणांचा देश असून माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांनी आपल्यातील कलागुणांचा वापर केल्यास कुण्या व्यावसायिक संस्थांचे ग्राहक नाही तर आपल्या बुध्दीच्या जोरावर विक्रेते बनू शकाल. असे प्रतिपादन फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावेत. याकरीता प्रधानमंत्री जिल्हास्तरीय मुद्रा योजना समन्वय व प्रचार समितीतर्फे यावल तालुकास्तरीय मेळावा आज तापी व्हॅली एज्यूकेशन सोसायटीचे धनाजी नाना महाविद्यालय. फैजपूर येथे पार पडला. या मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. थोरबोले बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, पंचायत समिती सदस्य श्रीमती कलीमाताई तडवी, सरफराज तडवी, योगेश भंगाळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार जितेंद कुंवर, गटविकास अधिकारी निलेश पाटील, फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर चौधरी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्याधर, डांभुर्णीचे सरपंच पुरजीत चौधरी आदि उपस्थित होते.
डॉ. थोरबोले पुढे म्हणाले की, तरुणांच्या हाती आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे मोबाईलवर सोशल मिडीयाचा वापर करतांना आपण न कळत कोणाचे तरी ग्राहक बनत असतो. तरुणांनी हेच तंत्रज्ञान अवगत करुन आपल्या बुध्दीचातुर्यांच्या जोरावर विविध ॲप तयार करुन आधुनिक तंत्रज्ञानाचे विक्रेता बनू शकता. देशाला महासत्ता बनविण्यासाठी बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे. त्यांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये प्रगती करता यावी. याकरीता प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा तरुणांनी लाभ घेऊन आपली व आपल्या कुटूंबाची प्रगती करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती विशद केली. तसेच जिल्ह्यातील तरुणांना या योजनेचा अधिकाधिक लाभ घेता यावा याकरीता जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यांचा नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी या मेळाव्यामध्ये शासनाच्या इतर योजनांचीही माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरीकांनी आपण ज्या योजनेसाठी पात्र ठरु शकतो त्या योजनेची माहिती घेऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी यावल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. बी. संदानशीव यांनी शासनाच्या उमेद या योजनेची तर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्याधर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी डांभुर्णीचे सरपंच पुरजीत चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास, विविध राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाचे अंगिकृत व्यवसाय असलेली विविध विकास महामंडळांचे स्टॉलही लावण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या मेळाव्यास सुशिक्षित बेरोजगार तरुण, बचतगटाच्या महिला, स्वयंरोजगार करु इच्छिणारे तरुण व्यावसायिक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रावेर येथे आज मेळाव्याचे आयोजन
याचप्रकारचे मेळावे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार असून रावेर येथील मेळावा आज (29 फेब्रुवारी) रोजी विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. तसेच मुक्ताईनगर 2 मार्च रोजी संत मुक्ताई कला व वाणिज्य महाविद्यालय येथे तर भुसावळ 4 मार्च रोजी बियाणी पब्लीक स्कुल, भिरुड हॉस्पिटलजवळ याठिकाणी तसेच बोदवड 6 मार्च रोजी बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे तर जामनेर 11 मार्च रोजी सोना इस्टेट मैदान, भुसावळ रोड, जामनेर येथे, तसेच पाचोरा 12 मार्च रोजी मानसिंगा मैदान, शिवाजी चौक येथे तसेच भडगाव 13 मार्च रेाजी शेतकरी सहकारी संघ, पाचोरा रोड याठिकाणी तर चाळीसगाव 16 मार्च, 2020 रोजी वाय. एन. चव्हाण आर्टस, सायन्स, कॉमर्स महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव याठिकाणी होणार असून या सर्व मेळाव्यांची वेळ ही सकाळी 10 वाजता राहणार आहे.
या मेळाव्यांना जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांसह ज्यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत कर्ज मागणी केलेली अशा व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.