नवी दिल्ली : वृत्तसंस्था । चीन आणि भारत देशातील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
पूर्व लडाखमधील सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास चार महिन्यानंतर पुन्हा एकदा बैठक होत आहे. यापूर्वी बैठकीचे ११ टप्पे पार पडले आहेत. मात्र या बैठकीत चीनने आडमुठी भूमिका कायम ठेवली होती. गोग्रा आणि हॉट स्प्रिंग भागावरील ताबा सोडण्यास नकार दिला होता. तसेच आतापर्यंत भारताला जे काही मिळालं आहे, त्यात समाधान मानावं असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे दोन्ही देशातील चर्चा बंद झाली होती. आता चार महिन्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे गोग्रा आणि हॉट स्प्रिंगवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. भारताकडून या बैठकीत एप्रिल २०२० पूर्वी असलेल्या स्थितीवर जोर देण्यात आला आहे.
मॉल्डोमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज बैठकीत तोडगा निघाल्यास सीमेवरील तणाव कमी होईल, असं सांगण्यात येत आहे. पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि देपसांगमधल्या भागातून चीनी सैनिकांनी माघार घेण्यास नकार दिला होता. आजही दोन्ही देशाचे सैनिक आमनेसामने आहेत गोग्रा आणि हॉट स्प्रिंगमध्ये सैनिकांची संख्या कमी असल्याने तोडगा निघण्याची शक्यता आहे. हॉट स्प्रिंग भागातून यापूर्वीच दोन्ही देशाच्या सैनिकांनी माघार घेतली असली, तरी तिथे दोन्ही देशाचे जवळपास ३० सैनिक तैनात आहेत. हा भाग दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा आहे.
मे २०२० मध्ये घुसखोरी केल्यापासून पीएलएने दक्षिण गलवानमधील गोग्रा व हॉट स्प्रिंग क्षेत्रातून माघार घेण्यास नकार दिला आहे. गोग्रा चौकी ही भारतासाठी संवेदनशील असून तेथे अजूनही सैन्य तैनात आहे. पीपी १७ ए बिंदूजवळ भारतीय हद्दीत अर्धा किलोमीटर आतपर्यंत चीनने घुसखोरी केली आहे. पीपी १७ व पीपी २३ या ठिकाणी चीनने गोग्रा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जमवाजमव केली असून तेथील तोफगोळा, दारूगोळा, हवाई संरक्षण यंत्रणा, अवजड वाहने अगदी कमी काळात भारतात येऊ शकतात. पँगाँग सरोवराच्या दक्षिणेला कैलाश रेंज येथे चिनी सैन्याने पुन्हा ताबा घेतला असून ब्लॅक टॉप व हेल्मेट हे सोडलेले भाग पुन्हा काबीज केले आहेत.