ढाबा लूट प्रकरणातील आरोपींना अटक

भुसावळ प्रतिनिधी । येथील हॉटेल सारंगधरमध्ये तोडफोड करून लूट केल्या प्रकरणी कुख्यात गुन्हेगार आसीफ उर्फ बाबा काल्या अस्लम बेग याच्यासह त्याच्या साथीदारांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गाला लागून असणार्‍या हॉटेल सारंगधरमध्ये सोमवारी रात्री उशीरा आसीफ उर्फ बाबा काल्या अस्लम बेग हा आपल्या साथीदारांसह आला. त्याने हॉटेलचे संचालक सारंगधर पाटील यांना धमकावत हॉटेलमध्ये तोडफोड केली होती. तसेच तो गल्ल्यातील सुमारे सात हजार रूपये घेऊन फरार झाला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.

दरम्यान, बाबा काल्या याच्यासह त्याच्या साथीदारांना आज बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली. यात आसीफ उर्फ बाबा काल्या अस्लम बेग; शेख रिझवान उर्फ बबलू शेख अशफाक; परवेज हमीद कुरेशी; सय्यद वसीम सैयद; शेख नईम शेख सलीम आणि समीरोद्दीन अमिरोद्दीन यांचा समावेश आहे. पोलीस अटक करत असतांना बाबा काल्या याने स्वत:वर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने त्याचा हा बनाव फसला.

ही कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कृष्णा भोये, अनिल मोरे, गणेश धुमाळ, नेव्हील, मंगेश गोटला, किशोर महाजन, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव, दिनेश कापडणे यांच्या पथकाने केली.

Protected Content