जळगाव प्रतिनिधी । घराकडे जाणाऱ्या एका प्रौढाला दोन अज्ञात व्यक्तींनी काहीही कारण नसतांना डोक्यावर विटा मारून जखमी केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कैनेन अख्तर अब्दुल हाफीज (वय-४८) रा. गेंदालाल मिली, डीपी जवळ हे कामाच्या निमित्ताने गावात आले होते. काम आटोपून ते घराकडे गुरूवारी रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाजवळून जात असतांना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना काहीही कारण नसतांना डोक्याला विट मारून फेकली. जखमी अवस्थेत त्यांचा पाठलाग केला असता दोन्ही अज्ञात व्यक्ती फरार झाले. ते किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी हाफीज यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी नांदुरकर करीत आहे.