जळगाव प्रतिनिधी । येथील कोविड रूग्णालयातल्या वृध्देच्या मृत्यू प्रकरणी निलंबीत करण्यात आलेले फिजीशियन डॉ. सुयोग चौधरी यांच्या निलंबनास विरोध होऊ लागला असून मणियार बिरादरीतर्फे फारूक शेख यांनी ही कारवाई अन्याय्य असल्याचे सांगून त्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे.
काल सायंकाळी जळगाव कोविड रूग्णालयातील महिलेच्या मृत्यूबाबत डीनसह दोन अन्य अधिकार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या अनुषंगाने मणियार बिरादरीने एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, हा सर्व प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा आहे. डॉक्टर सुयोग चौधरी हे सस्पेक्टेड आयसीयू तसेच कोविड आयसीयू याठिकाणी आपली कामगिरी बजावीत आहेत.
संबंधीत वृद्ध महिला मिसिंग झाल्याबद्दल त्यांनीच तक्रार केलेली होती. या तक्रारी बाबत त्याच वेळी सफाई कामगार पर्यवेक्षक व अधीक्षक यांनी योग्य ती पाहणी व तपासणी केली असती तर ती महिला मिळून आली असती. परंतु डॉक्टरांनी प्रसाधन गृह तपासावे त्यांच्या कर्तव्यात कुठेही लिहिलेले नाही. तरीसुद्धा निलंबित केले म्हणजेच चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार झालेला आहे. तरी तो प्रकार त्वरित रदद् करावा अशी मागणी मनियार बिरादरी ने केलेली आहे. या संदर्भात मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा देखील केली आहे.