पुणे वृत्तसंस्था । महाराष्ट्र अंद्धश्रदा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेले प्रमुख आरोपी विरेंद्र तावडे आणि विक्रम भावे यांचा जामीन अर्ज पुण्यातील विशेष कोर्टाने मंगळवारी फेटाळून लावला.
तावडे आणि भावे यांनी जुलै महिन्यांत जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. बचावपक्ष आणि फिर्यादी पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मंगळवारी या दोघांचाही जामीन फेटाळला. तावडेच्या वकिलांनी कोर्टात आणखी एक अर्ज दाखल करुन तावडेला पोलीस बंदोबस्तात त्याच्या आजारी वडिलांची भेट घेण्याची परवागनी द्यावी अशी विनंती केली होती.
सन २०१६ मध्ये अटक केलेला तावडे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटातील सूत्रधार असल्याचे म्हटलं आहे. सीबीआयने यापूर्वी सनातन संस्थेचे मुंबईतील वकिल संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहकारी भावे यालाही अटक केली होती. पुनाळेकर यांना नुकताच जामीन मिळाला मात्र भावेचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला.
सचिन अंदुरे, शरद कळसकर, सचिन पुनाळेकर, वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे हे पाच आरोपी सध्या अटकेत आहेत. पुण्यातील शिवाजीनगर येथील विशेष कोर्टात सुनावणी सुरु आहे.