डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज कोविड रुग्णालय म्हणून अधिग्रहित

 

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव खुर्द येथील गोदावरी फाऊंडेशन संचलीत डाॅ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि जनरल हाॅस्पिटल हे डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले असून अधिग्रहीतबाबत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज आदेश काढले आहे.

जळगाव जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग व कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता विषाणूमुळे बाधित, संशयीत असलेल्या व्यक्तींच्या उपचाराकरीता आपत्कालीन व्यवस्था म्हणून “गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल ” हे हॉस्पिटल सर्व मेडीकल, पॅरामेडीकल स्टाफ, सर्व उपलब्ध वैद्यकीय सोयीसुविधा व यंत्रणेसह अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल म्हणून घोषित केले आहे. जळगाव जिल्हयामध्ये कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत अधिग्रहीत करण्यात आले आहे. या हॉस्पीटलमध्ये रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, जामनेर व जळगाव ग्रामिण या क्षेत्रातील कोविड -19 बाधीत / संशयीत रुग्ण दाखल करण्यात यावेत. तथापि जळगाव जिल्हयातील उर्वरीत क्षेत्रातील कोविड-19 बाधीत / संशयीत रुग्णांना पूर्वी प्रमाणेच जिल्हा सामान्य रुग्णालय, व जिल्हा प्रशासनामार्फत घोषित करण्यात आलेले गणपती हॉस्पिटल, गोल्ड सिटी हॉस्पिटल या डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटलमध्ये दाखल करता येणार आहे.
डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटलमध्ये केवळ कोवीड-19 विषाणूमुळे बाधित झालेल्या, संशयीत व्यक्ती, रुग्णच दाखल करता येणार आहे. या व्यतीरीक्त अन्य कोणत्याही रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेता येणार नाही. डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल यांनी ICMR, केंद्रशासन , राज्य शासन यांचेकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात आलेल्या सूचना, निर्देश, SOP नुसार कोविड-19 विषाणू बाधित, संशयित रुग्णांवर उपचार करावेत. या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे सर्व मेडीकल, पॅरामेडीकल व अन्य कर्मचारी यांना जिल्हा प्रशासनाच्या मंजूरी शिवाय कोणत्याही प्रकारे कर्तव्यातून सुट, रजा परस्पर मंजूर करता येणार नाही असेही आदेशात नमूद आहे.

कोविड -19 बाधित / संशयीत रुग्णांवर केले जाणारे उपचार हे महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये 7 समाविष्ट असल्याने व डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल हे सदर आरोग्य योजनेमध्ये अंतर्भुत केले असल्याने कोविड -19 बाधित / संशयीत रुग्णांकडून अन्य कोणतेही अतिरीक्त शुल्क आकारण्यात येऊ नये.

‘त्या’ रुग्णांना बरे होतील तसा मिळणार डिस्चार्ज

या हॉस्पिटलमध्ये आजपावेतो जे रुग्ण दाखल आहेत त्या रुग्णांना ते जसे जसे बरे होतील त्यानुसार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात यावा. तसेच जळगाव जिल्हयातील महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये अंतर्भुत असणा-या अन्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या विचारात घेऊन ज्या रुग्णांना अशा रुग्णालयामध्ये दाखल करणे शक्य आहे, त्यांना संबंधित रुग्णालयात दाखल करावे. तथापि ज्या रुग्णांना गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल मधून अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करणे शक्य नसेल अशा रुग्णांना त्यांचेवरील उपचार पूर्ण झाल्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात यावा. जिल्हा प्रशासनामार्फत सदर गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल येथे रुग्णांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, याकरीता योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून विनोद गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Protected Content