सिंधूदुर्ग । उध्दव आणि राज ठाकरे यांच्या नातेवाईकांनी नाणार परिसरात मोठ्या प्रमाणात जमीनी घेतल्या असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार तथा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेकडून जोरदार विरोध होत आहे. मात्र, राजापूरमधील आजच्या समर्थनाच्या सभेमध्ये शिवसैनिक टोप्या आणि गमछे घालून आले होते. याचवेळी भाजपाचे माजी आमदार आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ठाकरे घराण्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
नाणार रिफायनरीला विरोध असल्याचे आणि ती होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येऊन सांगून गेले. पण याच ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांनी नाणारला लागणारी जमीन खरेदी केली आहे, हिंमत असेल तर पहायला या पुरावे दाखवतो, असा गंभीर आरोप जठार यांनी केला. या आरोपातून जठार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही नाव घेतले आहे.