ट्रॅक्टर रॅली उधळण्यासाठी पाकिस्तानातून प्रयत्न ; पोलिसांचा दावा

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्र सरकारच्या तीन कृषी कायदे हटवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्याचे नियोजन केले असतांना ही रॅली उधळण्यासाठी पाकिस्तानातून तब्बल ३००हून अधिक ट्विटर हँडल कार्यन्वित करण्यात आली होती असा दावा दिल्ली पोलिसांनी रविवारी केला आहे

लोकांची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करत शेतकऱ्यांची प्रस्तावित ट्रॅक्टर रॅली उधळण्यासाठी १३ ते १८ जानेवारी या कालावधीत पाकिस्तानातून ३०८ ट्विटर हँडल कार्यन्वित करण्यात आली होती. याबाबत विविध यंत्रणांकडूनही गुप्तवार्ता मिळाली होती, असे विशेष पोलिस आयुक्त (गुप्तवार्ता) दीपेंद्र पाठक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत दिल्ली पोलिसांनी हरयाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपल्यानंतर ट्रॅक्टर रॅलीसाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीच्या मार्गांबाबत अधिक माहिती देताना पाठक यांनी स्पष्ट केले की, ही रॅली टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश करेल आणि नंतर आपल्या मूळ ठिकाणी परत येईल. तीन मार्गांवर १७० किमीच्या मार्गांची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. रॅली शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध रितीने पार पडावी, यासाठी ट्रॅक्टरची मार्गांवर विभागणी करण्यात यावी आणि प्रजासत्ताक दिनाचा सोहळा तसेच सुरक्षा व्यवस्थेला कोणतीही बाधा पोहचू नये, अशा पद्धतीने रॅली पार पडेल, असे पाठक यांनी सांगितले.

Protected Content