कुंभमेळा बनावट कोरोना चाचणी घोटाळ्यात ईडीची छापेमारी

 

 डेहराडून : वृत्तसंस्था । कुंभमेळ्यामध्ये कोरोनाच्या बनावट चाचण्या झाल्याचे आरोप झाल्यानंतर शुक्रवारी ईडीनं या गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील अनेक प्रयोगशाळांमध्ये छापे टाकले.

या छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

 एप्रिल महिन्यात उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना देशात कुंभमेळ्याचं आयोजन करण्यावर मोठ्या प्रमाणार टीका केली गेली. मात्र, लसीकरण आणि इतर नियमांची काळजी घेतली गेल्याचं सांगितलं गेलं. अखेर, मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कुंभमेळा प्रतिकात्मक करण्याचा निर्णय जाहीर केला. 

 

ईडीनं  या चारही राज्यांमधील पॅथोलॉजी लॅब्जवर छापे टाकले. यात नोव्हस पॅथ लॅब्स, डीएनए लॅब्ज, मॅक्स कॉर्पोरेट सर्विसेस, डॉ. लाल चंदानी लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नालवा लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिडेट यांचा समावेश आहे. दिल्ली, हरिद्वार, डेहराडून, नोएडा आणि हिसार या ठिकाणी या लॅब्जच्या संचालकांच्या घरी देखील ईडीनं छापेमारी केली आहे.

उत्तराखंड पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. या सर्व प्रकणामध्ये बोगस चाचण्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा उत्तराखंड पोलिसांनी नोंदवला होता. त्यासंदर्भात हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यामधील बोगस चाचणी घोटाळ्याच्या चौकशीसाठी हे छापे मारल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आर्थिक घोटाळ्याच्या या चौकशीदरम्यान हे समोर आलं आहे की केंद्र सरकारने या प्रयोगशाळांना कुंभमेळ्यादरम्यान रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्याचं कंत्राट दिलं होतं. मात्र, या प्रयोगशाळांनी प्रत्यक्षात अगदीच कमी चाचण्या केल्या, पण चाचण्या केल्याच्या खोट्या नोंदी केल्या आहेत.  त्यांनी बोगस बिलं देखली तयार केली असून त्या आधारे आर्थिक फायदा करून घेण्याचा त्यांचा हेतू होता”.

उत्तराखंडच्या महसूल खात्यानं या चाचण्यांसाठी संबंधित खात्याला तब्बल ३ कोटी ४ लाख रुपयांचा निधी दिला आहे. अनेक लोकांसाठी या लॅब्ज एकच बनावट पत्ता किंवा एकच खोटा मोबाईल क्रमांक वापरत असत. हीच माहिती या लोकांच्या फॉर्ममध्ये भरली जायची. असं करून प्रत्यक्षात चाचणी न करताच मोठ्या संख्येने चाचणी केल्याचं या लॅब्ज भासवायच्या.

ज्या लोकांनी कधीच कुंभमेळ्याला भेटही दिलेली नाही, अशा लोकांच्या चाचण्या केल्याचं दाखवण्यात आलं आहे. या लॅब्जनी केलेल्या खोट्या चाचण्यांमुळे कुंभमेळ्याच्या वेळी हरिद्वारमधला पझिटिव्हिटी रेट ०.१८ टक्के दाखवला गेला. मात्र, प्रत्यक्षात तो ५.३ टक्के असल्याचा अंदाज ईडीच्या अधिकाऱ्यांनी वर्तवल्याचं  म्हटलं आहे.

या छाप्यांमधून मोठ्या प्रमाणवार बनावट कागदपत्र, बोगस बिलं, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि मालमत्तेसंबंधित कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.

 

Protected Content