ट्रक चालकाला मारहाण करून खिश्यातील रोकड लांबविली

रावेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील गोपीतोल काट्याजवळ एका ट्रक चालकाला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातून २ हजार रुपयांची रोकड जबरी लांबवल्याची घटना घडली आहे. या संदर्भात रावेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहम्मद मोहसिन मोहम्मद आमद (वय-३०) रा. फैजपूर ता.यावल जि. जळगाव हा तरुण ट्रक चालवून आपला उदरनिर्वाह करतो. ३० मार्च रोजी सकाळी सायंकाळी ६.३० वाजता रावेर शहरातील बराणपुर रोडवरील गोपीतून काटाजवळ ट्रक घेऊन आला होता. दरम्यान रावेर शहरातील शेख रशीद शेख मेहमूद व त्याचा मुलगा शेख बाशीद शेख रशीद दोघे राहणार रावेर, सद्दाम मणियार आणि त्याच्यासोबत असलेला एक जण अशा चौघांनी ट्रकचालक मोहम्मद मोहसिन मोहम्मद आमद याला चपटा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातील २ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. तसेच ट्रकचे काचा फोडून नुकसान केले. या संदर्भात मोहम्मद मोहसिन मोहम्मद आमद यांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.

Protected Content