मुंबई: वृत्तसंस्था । भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा अभिनय क्षेत्रात पदार्पण करतेय. एका वेब सीरिजमध्ये ती झळकणार आहे. ही सीरिज क्षयरोगासंबंधित जनजागृती करणारी असेल. एकूण पाच एपिसोड्सच्या सीरिजची कथा लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
निषेध अलोन टुगेदर’ असं या सीरिजचं नाव असून सीरिजची कथा विकी आणि मेघा या जोडप्याच्या आयुष्याभोवती फिरते. यात विकीचं पात्र अभिनेता सयेद राझा अहमद, तर मेघाचं पात्र अभिनेत्री प्रिया चौहान साकारणार आहे. विकी आणि मेघा लॉकडाउनसारख्या कठीण काळात कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जातात, हे सानिया सांगेल.
निषेध अलोन टुगेदर २७ नोव्हेंबरपासून दर शुक्रवारी एमटीव्ही इंडिया आणि एमटीव्ही निषेध यांच्या युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडलवर उपलब्ध असणार आहे. या सिरिजद्वारे सानिया डिजिटल विश्वात पदार्पण करणार असून लॉकडाऊन दरम्यान तरुणांना आलेल्या आव्हानांवर आणि या कठीण काळात आणखी चांगले संबंध जोडण्याची किती गरज आहे यावर चर्चा करणार आहे. तिच्या संभाषणांद्वारे ती या काळात टीबी ग्रस्त असलेल्या लोकांना सामोरे जाणार्या आव्हानांना ती विशेषत: अधोरेखित करेल आणि योग्य निदान, उपचार, आधार आणि काळजी घेण्याचे महत्त्व सांगणार आहे.