टाटा समूहाचा थेट मिस्त्री कुटुंबीयांची हिस्सेदारी खरेदीचा प्रस्ताव न्यायालयात

मुंबई : वृत्तसंस्था । टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री आणि टाटा समूहातील वादावर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु आहे. या न्यायालयीन लढाईत कधी टाटांच्या बाजूने तर कधी सायरस मिस्त्रींच्या बाजूने कल पहायला मिळत आहे. आता यात एक नवीन ट्विस्ट आला आहे. मिस्त्री कुटुंबीयांशी असलेला वाद मिटवण्यासाठी टाटा समूहाने थेट मिस्त्री कुटुंबीयांची हिस्सेदारी खरेदी करण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला आहे. मात्र त्यावर मिस्त्री कुटुंबियांकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

टाटा समूहातील सर्वात मोठे हिस्सेदार म्हणून म्हणून मिस्त्री कुटुंबीयांकडे टाटा सन्सचे १८ टक्के शेअर्स आहेत. ही पूर्ण हिस्सेदारी खरेदी करण्याची ऑफर टाटा समूहाने दिली आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत टाटा समूहाने हा प्रस्ताव न्यायालयापुढे मांडला.

मिस्त्री कुटुंबीयांनी शापूरजी पालोनजी समूहावरील कर्ज वाढले असून ते फेडण्यासाठी टाटा समूहाचे शेअर गहाण ठेवण्यास परवानगी देण्याची विनंती न्यायालयाला केली होती.

शापूरजी-पालोनजी समूह सध्या आर्थिक संकटात आहे. त्यांना रोख चणचण जाणवत असून निधी उभारणीसाठी त्यांनी टाटा समूहाचे शेअर गहाण ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, मात्र टाटा समूहाचे शेअर गहाण ठेवलयास ते इतर गुंतवणूकदारांच्या हाती जातील. जे लोक भविष्यात टाटा समूहाला हानी पोहचवू शकतात. शेअर गहाण ठेवणे टाटा समूहासाठी जोखमीचे आहे, असा युक्तिवाद टाटा समूहाच्या वकिलाने केला. मिस्त्री कुटुंबीयांची सर्व १८ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची टाटा समूहाची तयारी आहे, असे वकिलांनी न्यायालतात सांगितले.

न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी स्थगित केली असून या कालावधीत शेअर विक्री किंवा गहाण ठेवू नये, असे निर्देश मिस्त्री कुटुंबियांना देण्यात आले आहे. २०१६ मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. या निर्णयाला सायरस मिस्त्री यांनी कंपनी कायदा लवादाकडे आणि न्यायालयात आव्हान दिले होते. आता पुन्हा २८ ऑक्टोबर रोजी या खटल्याची सुनावणी होणार आहे.

Protected Content