केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यास प्रारंभ : जाणून घ्या महत्वाच्या तरतुदी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सन २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यास प्रारंभ केला असून यात अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

निर्मला सीतारामन आज नेमक्या काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. या पार्श्‍वभूमिवर, त्यांनी अकरा वाजेपासून संसदेत अर्थसंकल्प मांडण्यास प्रारंभ केला आहे. यात अर्थसंकल्प मांडतांना त्या म्हणाल्या की, देशाचा विकासदर ९.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. करोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवला असून आरोग्यावर भर दिला. आत्मनिर्भर भारताला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बँकाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहोत अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

यासोबत केंद्र सरकारने देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यामधून देशात ६० लाख नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील असं निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तर एलआयसीचा आयपीओ लवकरच येणार असल्याची महत्वाची घोषणा देखील त्यांनी केली. यावर्षी सरकारकडून मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी झाली असून थेट रक्कम थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यातील काही रक्कम आधीच जमा करण्यात आली असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितले. कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये आता नैसर्गिक शेती, झीरो बजेट शेती आदी विषयांचा समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

निर्मला सीतारामन यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील घर बांधणार्‍यांसाठी राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ हजार कोटी रूपयांची यंदा तरतूद करण्यात येत असल्याचे सभागृहात सांगितले. दरम्यान, वन क्लास वन टीव्ही चॅनेल योजना वाढवण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल सुरु करणार असून त्याची संख्या १२ वरुन २०० पर्यंत वाढवण्यात येईल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. यासोबत केंद्र सरकार डिजीटल विद्यापीठ सुरु करणार असून डिजीटल विद्यापीठ देशातील प्रादेशिक भाषांमध्ये सुरु होणार. डिजीटल विद्यापीठांशी देशातील नामांकित विद्यापीठांचे करार असणार असंही त्यांनी सांगितलं.

३.८ कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोचवण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

Protected Content